चोपडा (प्रतिनिधी ):चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला असून या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गांजासह कार, मोटारसायकल व मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात “नशामुक्त भारत” अभियानांतर्गत अवैध अमली पदार्थांची विक्री, वाहतूक व साठा यावर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी आपल्या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे सातत्याने कारवाया करण्याचे निर्देश दिले होते.
२६ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.५३ वाजता पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाली की, लासूर ते हातेड रस्त्यावरील पाटचारीजवळ हातेड शिवारात काहीजण गांजाची तस्करी करत आहेत. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचत संशयित हयुंडाई सॅन्ट्रो (MH-14-BK-3113) या कारची तपासणी केली. तपासणीदरम्यान कारमधून ७ किलो ११६ ग्रॅम गांजा आढळून आला.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४६/२०२६ दाखल करण्यात आला असून NDPS Act, 1985 अंतर्गत कलम २०(ब) व २२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिसांनी विष्णू सुभाष सुळे (वय ३७, रा. पिंप्री, जि. पुणे), प्रकाश बबन शिंदे (वय ३०, रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) आणि प्रशांत ताराचंद अथाणी (वय २९, रा. टाकळीमिया, देवळालीप्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) या तिघांना अटक केली आहे.
जप्त मुद्देमाल :
– ७ किलो ११६ ग्रॅम गांजा – ₹१,७७,९००
– हयुंडाई सॅन्ट्रो कार – ₹३,००,०००
– पल्सर मोटारसायकल – ₹९०,०००
– पाच मोबाईल फोन – ₹४१,०००
एकूण जप्त मुद्देमाल : ₹६,०८,९००
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठा याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक किरण पारधी व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.








