मेहरुण (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. “शाळा हेच आमचे पंढरपूर” या ध्येयवाक्याला साजेसा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच शाळेप्रती असलेले प्रेम, जिव्हाळा आणि कृतज्ञतेची भावना अधोरेखित करणारा ठरला.
उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, केवळ वृक्षारोपण न करता या रोपांच्या संगोपनाची जबाबदारीही माजी विद्यार्थ्यांनी स्वीकारली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत, “शाळा हेच आमचे पंढरपूर” ही भावना प्रत्येक विद्यार्थ्याने जपावी आणि आपल्या शाळेच्या विकासासाठी सातत्याने योगदान द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक मुकेश नाईक, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प करून पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर आयोजित या उपक्रमामुळे शाळेचा परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होणार असून, पर्यावरण संवर्धनासोबतच शाळेबद्दलची आत्मीयता आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.








