जळगाव (प्रतिनिधी):शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान व सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन बहिणाबाई उद्यानासमोरील परिसरात उत्साहात पार पडले. आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.
यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, सभागृह नेते नितीन लढ्ढा, गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेवक तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार भोळे यांनी सांगितले की, रिंग रोडमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होईल. तसेच शहराच्या विकासाला गती मिळण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी नमूद केले. उपस्थित मान्यवरांनीही काम दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली.








