मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश; ११ दुचाकींसह ३ आरोपी जेरबंद, जिल्हापेठ पोलिसांची दमदार कारवाई

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यात जिल्हापेठ पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. विशेष तपास मोहीम राबवत पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्ह्यांचा छडा लावून ३ आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल ११ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत ४ लाख ३० हजार रुपये इतकी आहे.

 

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला.

सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून चोरीला गेलेल्या मोटारसायकल प्रकरणाच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी जियाउलहक अब्दुलहक शेख (वय ३४, रा. आझादनगर, अडावद) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ लाख २० हजार रुपये किमतीच्या ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या मोटारसायकली जिल्हापेठ, पारोळा, शिरपूर, चोपडा, यावल तसेच मध्यप्रदेशातील विविध ठिकाणांहून चोरी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.

त्यानंतर गुन्हा क्रमांक १०७/२०२६ च्या तपासात पोलिसांनी उमेश प्रदीप पाटील (वय २२, रा. पिंगळवाडी, ता. अमळनेर) याला अटक केली. त्याच्याकडून १ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या ३ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, एमआयडीसी व फुले मार्केट परिसरातील चोरीच्या गुन्ह्यांबाबत पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, १७ जुलै रोजी पेट्रोलिंगदरम्यान कैलास वसंतदास मथुरे (वय २८, रा. जुनोने, ता. जामनेर) हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. चौकशीत त्याच्याकडील हिरो HF डिलक्स मोटारसायकल ही सोयगाव पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करून आरोपी व वाहन पुढील तपासासाठी सोयगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांवर मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नागरिकांनी वाहन पार्क करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी, वाहनांना लॉक व इतर सुरक्षा साधनांचा वापर करावा तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे १ लाखांच्या चोरीचा काही...

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान):दि. १७ जुलै : जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील HDFC बँकेजवळ घडलेल्या १ लाख रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्याचा शनिपेठ पोलिसांनी काही तासांत...

जळगाव : विनापरवाना गावठी कट्ट्यासह फिरणारा तरुण एमआयडीसी पोलिसांच्या...

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान): शहरातील अयोध्यानगर परिसरात विनापरवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगून दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका तरुणाला एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध...

घरफोडी करणारा अट्टल चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात; चोरीचे ८...

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान): जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील देशी दारू दुकानात घरफोडी करून रोख रक्कम चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या एका दिवसात अटक करत...

संपादक - रजत शेख

Latest