जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान)एमआयडीसी पोलीस ठाण्याने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या दोन दिवसांत छडा लावत अकोला जिल्ह्यातून एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली सुमारे ४० हजार रुपये किमतीची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास फिर्यादी यांनी जळगाव शहरातील कासमवाडी येथील मासूमवाडी बाजारात जाताना आपली मोटारसायकल पांचाळा वस्तीसमोरील मोकळ्या जागेत उभी केली होती. काही वेळाने परत आल्यानंतर मोटारसायकल जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही वाहन न मिळाल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस क्र. ५९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी, पोकॉ किरण पाटील, पोकॉ गणेश ठाकरे आणि पोकॉ नरेंद्र मोरे यांचे विशेष पथक तयार करून तपास सुरू केला.
पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि इतर तपासाच्या आधारे संशयिताची ओळख पटवली. त्यानंतर १३ जुलै २०२६ रोजी अकोला जिल्ह्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवाबपुरा परिसरात सापळा रचून शेख जाफर हुसेन (वय ४१, रा. अल्हेरा कॉलनी, धुळे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली.
आरोपीकडून एमएच-९९-डीडी-४०९९ क्रमांकाची, काळ्या रंगाची लाल पट्टा असलेली हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल, अंदाजे ४० हजार रुपये किमतीची, हस्तगत करण्यात आली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.








