धावत्या बसमधील २५ लाखांची बॅग चोरी उघड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, चार आरोपी जेरबंद

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी): धावत्या लक्झरी बसमधून २५ लाख रुपये रोख असलेली बॅग चोरणाऱ्या चौघा सराईत आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या एका दिवसात जेरबंद करत मोठे यश मिळवले आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले २५ लाख रुपये रोख तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली ५ लाख रुपये किमतीची मारुती डिझायर कार (MH-47-C-7877) असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पुढे एमआयडीसी पोलीस करत आहेत.

बसमध्ये ठेवलेली बॅग लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा येथील नितीन पुरुषोत्तम वाणी हे जळगावातील सराफ व्यावसायिक प्रफुल्ल भागचंद सुराणा यांच्याकडे गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत आहेत. कोल्हापूर येथे चांदी खरेदीसाठी ११ जुलै रोजी ते २५ लाख रुपये रोख घेऊन हरे कृष्णा ट्रॅव्हल्सच्या बसने निघाले होते.

रात्री सुमारे ८.३० वाजता बस फर्दापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील हॉटेलवर जेवणासाठी थांबली. यावेळी नितीन वाणी यांनी पैशांची बॅग बसमध्येच ठेवून जेवणासाठी प्रवेश केला. परत आल्यानंतर बॅग गायब झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सोनू उर्फ राम भगवान सारवाण (वय ३२) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत इतर साथीदारांची नावे उघड केली.

यानंतर पोलिसांनी शेख रहेमान शेख निसार (वय ३३), सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे (वय ३८) आणि दशरथ सुरेश चौधरी (वय ३६) यांनाही अटक केली. चौघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीतील संपूर्ण २५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली मारुती डिझायर कारही पोलिसांनी हस्तगत केली.

सराईत गुन्हेगारांचा सहभाग

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दशरथ सुरेश चौधरी याच्यावर यापूर्वी जळगाव शहर, शनिपेठ व भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यांत दरोडा, चोरी, मारहाण, सरकारी कामात अडथळा आदी स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, संतोष पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

बोदवड हद्दीत पोलिसांचे व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन ६० रेकॉर्डवरील आरोपींची...

बोदवड(प्रतिनिधी):दि. ४ सप्टेंबर : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बोदवड पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शुक्रवारी व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन...

चोरीची मोटारसायकल विक्रीचा डाव उधळला; दोघे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात,...

जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन): चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विनाक्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, ती...

क्षेत्रभेटीतून धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख बेलेश्वर महादेव मंदिर...

मेहरूण(प्रतिनिधी: सरिता महाजन): विद्यार्थ्यांना भारतीय धार्मिक व सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, संस्कृती व परंपरांविषयी आदर निर्माण व्हावा, तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानाची सांगड घालता...

संपादक - रजत शेख

Latest