चोपडा | प्रतिनिधी
जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि चोपडा शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची वाहतूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर धडक कारवाई करत तीन आरोपींना अटक केली. या कारवाईत एक गावठी कट्टा (पिस्तूल), दोन मॅगझिन, तीन मोबाईल फोन आणि एक कार असा सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, काही इसम एका कारमधून विनापरवाना गावठी कट्टा घेऊन लासूर-चुंचाळे मार्गे चोपडा शहराकडे येत आहेत. या माहितीची खातरजमा करून एलसीबी व चोपडा शहर पोलिसांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले.
पथकाने चोपडा-लासूर-चुंचाळे रस्त्यावरील शनिमंदिर परिसरात सापळा रचला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास संशयित Hyundai EON (MH-20 EE-6103) कार अडवून पंचांसमक्ष झडती घेतली असता कारच्या मागील सीटखाली एक गावठी कट्टा, त्यासह एक मॅगझिन व एक अतिरिक्त मॅगझिन आढळून आले. तसेच आरोपींकडून तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ज्ञानेश्वर रामकृष्ण माळी (वय ३९, रा. कुन्हाड खुर्द, ता. पाचोरा), सचिन रोशन पवार (वय ३४, रा. मयूर पार्क कॉलनी, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि अनिल कचरे साळुंखे (वय ३७, रा. जाधव गल्ली, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी ६० हजार रुपयांचा गावठी कट्टा व मॅगझिन, १० हजार रुपयांचे अतिरिक्त मॅगझिन, ५ लाख रुपयांची Hyundai EON कार आणि ३० हजार रुपयांचे Oppo, Vivo व Redmi कंपनीचे तीन मोबाईल फोन असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८५/२०२६ भारतीय हत्यार कायदा (Arms Act) कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चोपडा शहर पोलीस करत आहेत.








