भुसावळ (प्रतिनिधी) : शहरालगतच्या मिलिटरी स्टेशन कॅम्पस व झेडटीआरआय बोगद्याजवळील कालिका माता मंदिराचे पुजारी संतोष रघुवीर मंचल (वय ५५) यांची अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात जड वस्तूने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२९ जून) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे भुसावळ शहरासह रेल्वे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या सहा ते सात वर्षांपासून संतोष मंचल हे मंदिर परिसरातील पत्र्याच्या खोलीत वास्तव्यास असून मंदिराची पूजा-अर्चा व देखभाल करत होते. सोमवारी सकाळी सुमारे १० वाजता एक भाविक दर्शनासाठी मंदिरात गेला असता, मंचल हे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एकच आक्रोश उसळला. दरम्यान, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, स्थानिक गुन्हे शाखा तसेच भुसावळ शहर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जळगाव येथील फॉरेन्सिक तज्ज्ञ व ठसेतज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्यात आले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीचा हेतू, जुने वैमनस्य किंवा इतर कोणते कारण या हत्येमागे आहे का, याचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.








