रावेर गुन्हे शोध पथकाची कारवाई : दोन अट्टल दुचाकी चोर जेरबंद, दोन मोटारसायकली जप्त

Spread the love

रावेर (प्रतिनिधी) : रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावत दोन अट्टल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरातील इतर दुचाकी चोरीच्या घटनांचाही उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

रावेर पोलिस ठाण्यात दि. २३ जून २०२६ रोजी गु.र.नं. ३२२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी अतुल अर्जुन महाजन (वय ४२, रा. कुसुंबा ता. रावेर) हे मराठा मंगल कार्यालयात लग्नसमारंभासाठी गेले असता त्यांची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न (क्रमांक MH-19-DT-7111) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने ओळख पटविणे कठीण झाले होते. त्यानंतर संशयितांचे फोटो आणि चोरी झालेल्या वाहनाची माहिती विविध गावांतील व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रसारित करण्यात आली.

दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे चोरीची मोटारसायकल खानापूर येथील दोन व्यक्तींकडे दिसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने खानापूर येथे जाऊन संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरीची मोटारसायकल बुरहानपूर रोडवरील हॉटेल काकाश्रीच्या मागील बाजूस असलेल्या वनक्षेत्रात लपवून ठेवल्याचे सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता चोरीची होंडा युनिकॉर्न तसेच आणखी एक हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (विना क्रमांक) असा एकूण २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी मोटारसायकल नेमकी कुठून चोरी करण्यात आली याचा तसेच तिच्या मालकाचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे समाधान शंभू रमेश जाधव (वय ३३) व मनोज भागवत चंदनकर (वय ३९, दोघेही रा. खानापूर ता. रावेर) अशी आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण आणि सुकेश तडवी यांनी केली. पुढील तपास पोहेकॉ समाधान ठाकूर करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest