दौंड(प्रतिनिधी):शहरात आणि परिसरात बुलेट मोटारसायकलचे सायलेन्सर बदलून कर्णकर्कश व मोठा आवाज करत दहशत निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध दौंड पोलीस स्टेशनने धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत एकूण १९ बुलेट व अन्य मोटारसायकली ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही बुलेट चालकांकडून वाहनांचे मूळ सायलेन्सर बदलून (Modified Silencer) फटाक्यांसारखा किंवा मोठा कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवण्यात आले होते. या आवाजामुळे रस्त्यावरून चालणारे सर्वसामान्य नागरिक, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींची गंभीर दखल घेत दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत शेडगे यांनी अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी एका विशेष पथकाची नियुक्ती केली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी हद्दीतील संशयास्पद १९ बुलेट व मोटारसायकली थांबवून त्यांची कसून तपासणी केली. तपासणीअंती या वाहनांवर बेकायदेशीरपणे बसवण्यात आलेले मॉडिफाईड सायलेन्सर जागीच काढून टाकण्यात आले. तसेच संबंधित वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, भविष्यात असे बेकायदेशीर बदल केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी सक्त ताकीदही देण्यात आली आहे.
या धडक कारवाईमुळे विनाकारण सायलेन्सरचा आवाज करणाऱ्या हुल्लडबाजांचे धाबे दणाणले असून, दौंडमधील सामान्य नागरिकांमधून आणि ज्येष्ठ नागरिकांकडून पोलिसांच्या या कामगिरीचे मोठे स्वागत केले जात आहे.








