अमळनेर(प्रतिनिधी):दि. 9 जून : अमळनेर-धुळे महामार्गावर मंगरूळ गावाजवळील हॉटेल वृंदावन परिसरात मंगळवारी सकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास कार, मोटारसायकल आणि एसटी बस यांच्यात भीषण तिहेरी अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोटारसायकल (एमएच-18 सी-8719) आणि एसटी बस (एमएच-13 सीयू-7540) अमळनेरहून धुळ्याकडे जात होत्या. त्याचवेळी धुळ्याकडून अमळनेरच्या दिशेने येणारी कार (जीजे-19 एएफ-3147) भरधाव वेगात समोरून आली आणि मोटारसायकल तसेच एसटी बसला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारमधील चार जणांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. अपघातात एक जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, महाजन कुटुंबीय अमळनेर येथे साखरपुडा कार्यक्रमासाठी येत होते. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
गंभीर जखमी व्यक्तीस पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किरकोळ जखमीवर अमळनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.








