जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान):जुन्या वादातून एका तरुणाच्या घरात घुसून गावठी कट्ट्याचा धाक दाखवत दहशत माजवणाऱ्या रेकॉर्डवरील तीन आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश अजय सोनार (वय 26, रा. लक्ष्मी नगर, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 1.30 वाजेच्या सुमारास आरोपी रोशन उर्फ बबलू हिरामन मनोरे (रा. सम्राट कॉलनी, जळगाव) याने जुन्या वादाच्या कारणावरून हातात कोयता घेऊन आपल्या साथीदारांसह फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. आरोपींनी फिर्यादीच्या आईला धमकावत “तुझा मुलगा आकाश कुठे आहे, त्याचा आज मर्डर करतो,” असे म्हणत शिवीगाळ केली. फिर्यादी घरी न आढळल्याने आरोपींनी घरावर दगडफेक करून परिसरात दहशत निर्माण केली.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 639/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच आर्म अॅक्टच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना 12 ऑगस्ट 2026 रोजी गुन्हे शोध पथकाने रोशन उर्फ बबलू हिरामन मनोरे (वय 25), गणेश भास्कर दंडगव्हाळ (वय 27) आणि अविनाश रामेश्वर राठोड (वय 27) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपी गणेश दंडगव्हाळ याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ रमेश चौधरी करीत आहेत.
ही कारवाई मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक जळगाव, मा.श्री संदीप गावीत अपर पोलीस अधीक्षक जळगाव, मा.श्री नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग, श्री बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोस्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोहेकॉ/ रामकृष्णं पाटील, पोकॉ/ नितिन ठाकुर, पोकॉ/ किरण पाटील, पोकों/ गणेश ठाकरे, पोकॉ/राहुल घेटे, यांनी केली आहे..








