भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांनी संयुक्त कारवाई करत संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतले.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, १२६२८ अप कर्नाटक एक्स्प्रेसच्या पुढील जनरल डब्यात तपासणी करण्यात आली. यावेळी उमेश वर्मा (वय ४२, रा. खंडवा, मध्य प्रदेश) हा संशयास्पदरीत्या आढळून आला. त्याच्याकडील मरून रंगाच्या ‘LAVI SPORT’ कंपनीच्या ट्रॉली बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये Tulsi Royal Zafrani Zarda चे १२० पाऊच तसेच Premium Rajnigandha चे १ हजार ६६४ नग आढळून आले.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ६० हजार २८० रुपये असून त्याचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई लोहमार्ग पोलीस निरीक्षक गोविंदा पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत. कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, धनराज लुले, जय कोळी, विलास जाधव, बाबू मिर्झा, अंकुश लांडगे तसेच आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक शिवानंद गीते व दीपक तायडे यांनी सहभाग घेतला.








