भुसावळ(प्रतिनिधी) : भुसावळ शहर तसेच लगतच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि रेल्वे व दीपनगर पॉवर प्लांट परिसरातील भंगार व कोळसा चोरीच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलीस दल आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांच्या संयुक्त विद्यमाने पहाटे विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. आज पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत झालेल्या या धडक मोहिमेत अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली असून अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या नेतृत्वात ही व्यापक कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान रेल्वे पोलीस ठाण्याकडील तीन गैरजामिनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाठ (उर्फ श्याम काळ्या) याला अटक करून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, एन्झेल नगर परिसरात कारवाई करताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील पाहिजे असलेला आरोपी शौकीब शहा शरीफ शहा याच्याकडून एक देशी कट्टा जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपनगर पॉवर प्लांट परिसरातील कारवाईत राजू मुरकाडे (रा. निंभोरा) याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे ५० किलो केबल तसेच केबल कापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
संयुक्त पथकाने रेल्वे व दीपनगर परिसरातील भंगार आणि कोळसा चोरीशी संबंधित ६० सराईत गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेतली. तसेच २५ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. भंगार दुकाने आणि गोदामांचीही तपासणी करण्यात आली.
याशिवाय, पकडण्यात आलेल्या व संशयित गुन्हेगारांचे अद्ययावत डिजिटल रेकॉर्ड तयार करून जळगाव पोलीस दल आणि RPF यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. यामुळे भविष्यात अशा गुन्हेगारीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.
या विशेष मोहिमेत जळगाव पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी, जळगाव मुख्यालयातील RCP प्लाटून तसेच RPF चे ११ अधिकारी आणि ५३ कर्मचारी सहभागी झाले होते. रेल्वे व शासकीय मालमत्तेची चोरी, भंगार चोरी आणि संबंधित गुन्हेगारीला कोणतीही मुभा दिली जाणार नाही. अशा गुन्ह्यांविरोधात भविष्यातही सातत्याने विशेष मोहिमा राबविण्यात येतील, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल, अवैध भंगार खरेदी-विक्री अथवा गुन्हेगारीविषयीची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल 112 वर कळवून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.








