- जळगाव(प्रतिनिधी) : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू नगर परिसरात बंद घर फोडून चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 23 हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
- नेहरू नगर येथे राहणारे फिर्यादी गोविंद रामदास पाटील हे पत्नीसमवेत नातवंडांच्या अपघातामुळे त्यांना भेटण्यासाठी 8 जून 2026 रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. दरम्यान, 20 जून रोजी शेजाऱ्यांनी फोन करून त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यानंतर पाटील हे जळगावला परतले असता घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. घरातील संसारोपयोगी वस्तूंसह चांदीचे देव चोरीस गेल्याने त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
- याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 558/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 305(अ) व 331(3)(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
- गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना सखोल तपासाच्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
- तपासादरम्यान 22 जून रोजी जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात सापळा रचून शाहरुख शहा सिकंदर शहा (वय 24, रा. पंचशील नगर), मुकेश राजू परमार (वय 22, रा. गौतम नगर) आणि दीपक राजू पाटील (वय 24, रा. पंचशील नगर) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
- आरोपींकडून 15 हजार रुपये किमतीचे 60 ग्रॅम वजनाचे सहा चांदीचे देव, 3 हजार रुपये किमतीची एचपी कंपनीची गॅस हंडी तसेच 5 हजार रुपये किमतीची पितळी व तांब्याची भांडी असा एकूण 23 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
- ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत चनके तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
बंद घर फोडून चोरी करणारे तिघे जेरबंद; 23 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
संपादक - रजत शेख








