ट्रक चालकावर चाकू हल्ला करून लूट करणाऱ्या टोळीचा १२ तासांत पर्दाफाश; ३ आरोपी अटकेत, एक अल्पवयीन ताब्यात

Spread the love

 


जळगाव(प्रतिनिधी):दि. २० जून —

जळगाव-भुसावळ बायपास रस्त्यावर ट्रक चालकाला अडवून चाकूने हल्ला करत रोख रक्कम आणि ऑनलाइन पैसे लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगार टोळीचा जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना येथील गांधी चौक परिसरात राहणारे ट्रक चालक मुकेश रामराव राठोड (वय ३०) हे त्यांच्या ताब्यातील ट्रक (क्र. MH-21-BH-3536) घेऊन पाळधी परिसरातून जात असताना २० जून रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास चारचाकी व दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी त्यांचा ट्रक अडवला.

मुख्य आरोपी साहिल शेख जब्बार शेख उर्फ काल्या आणि त्याच्या साथीदारांनी ट्रकवर दगडफेक करत चालक व क्लीनरला बेदम मारहाण केली. यावेळी एका आरोपीने मुकेश राठोड यांच्या उजव्या हातावर चाकूने तीन वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या खिशातील ५,५०० रुपये रोख रक्कम तसेच फोनपे स्कॅनरद्वारे जबरदस्तीने ९८४ रुपये ऑनलाइन हस्तांतरित करून घेतले आणि घटनास्थळावरून फरार झाले. जखमी चालकावर सध्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), १२६(२), ११५(२), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी डीबी पथकाला तातडीने तपासासाठी रवाना केले. पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या १२ तासांत आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद केले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये साहिल शेख जब्बार शेख उर्फ काल्या (वय २६, रा. पाळधी), विशाल चुडामण पाटील (वय १८, रा. बिबा नगर, जळगाव) आणि मोहित हेमंत गुजर (वय १९, रा. पिंप्राळा, जळगाव) यांचा समावेश आहे. याशिवाय एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

मुख्य आरोपी साहिल शेख उर्फ काल्या याच्यावर यापूर्वी धरणगाव पोलीस ठाण्यात बस अडवून चालकास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच आरोपी विशाल पाटील याच्यावरही रामानंदनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील तसेच डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

वाढवणा हद्दीत ५.८७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकास अटक

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

संपादक - रजत शेख

Latest