दिवसा ढवळ्या जबरी चोरी प्रकरण उघड; पाचोरा पोलिसांची तात्काळ कारवाई, तीन आरोपी जेरबंद

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील लक्ष्मी आंगण कॉलनी परिसरात दिवसा ढवळ्या झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पाचोरा पोलिसांनी अवघ्या एका दिवसात छडा लावत तीन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना श्रीकांत धिवरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पाचोरा पोलिसांनी ही उल्लेखनीय कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजता सातगाव डोंगरी येथील रहिवासी तथा पाचोरा येथील लक्ष्मी आंगण कॉलनीत वास्तव्यास असलेल्या कुसुम एकनाथ मोकळे (वय ४२) यांच्या घरी आरोपी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुलेकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी ‘अॅमेझॉनचे पार्सल आले आहे’ असे सांगून प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलांना धमकावत बंदुकीचा धाक दाखविला. तसेच घरातील कपाटांची झडती घेऊन सात हजार रुपये रोख व मुलाच्या गळ्यातील ७०० रुपये असा एकूण ७,७०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. १३ जून रोजी आरोपी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुलेकर (वय २१, रा. सातगाव डोंगरी) याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्याचा मामा गोकुळ महादू वाघ (पाटील) (वय ३७, रा. सातगाव डोंगरी) याचा सहभाग निष्पन्न झाला. तसेच योगेश परशराम शिंदे (वय ३१, रा. शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) यालाही ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून चोरीस गेलेले ७,७०० रुपये रोख व गुन्ह्यात वापरण्यात आलेले नकली खेळण्यातील पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

तपासात असे समोर आले की, फिर्यादी यांच्या घरात सोन्याच्या चिपा असल्याची माहिती गोकुळ वाघ याला मिळाली होती. त्याने ही माहिती त्याचा मित्र नितीन पाटील याला दिली. त्यानंतर नितीन पाटील याने आपल्या परिचयातील दोन व्यक्तींना बोलावून आरोपी चेतन भुलेकरसोबत पाठविले. सोन्याच्या चिपा चोरी करण्याच्या उद्देशाने या सर्वांनी कट रचून जबरी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच गोकुळ वाघ व नितीन पाटील यांनी गुन्ह्यास अपप्रेरणा दिल्याचेही उघड झाले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वापुसाहेब रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, विलास पाटील, योगेश पाटील, हरीश परदेशी, गणेश कुंवर, श्रीराम शिपी आणि नितीन भालेराव यांचा सहभाग होता.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest