जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुका पोलिसांनी चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या अवघ्या दोन तासांत आवळत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ११ जून २०२६ रोजी पहाटे १.३० ते ३.४५ वाजेच्या सुमारास फिर्यादी चेतन प्रकाश पाटील (वय ३५, रा. खोटेनगर, जळगाव) हे आपल्या मित्रांसह मोटारसायकलने जळगाव-पाळधी मार्गावरून जात होते. यावेळी हॉटेल साई गार्डन व हॉटेल राधिका परिसरात चार आरोपींनी त्यांची मोटारसायकल अडवली.
आरोपींनी चाकूचा धाक दाखवत फिर्यादी व त्यांच्या मित्रांना मारहाण केली, शिवीगाळ व दमदाटी करत त्यांच्या खिशातील सुमारे ७ हजार ८०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच मोटारसायकलीची तोडफोड करून घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(८), १२६, ११५(२), ३५१(२), ३५२, ३२४(४) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दोन तासांत आरोपी जेरबंद
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तातडीने डीबी पथकाला तपासासाठी रवाना केले. गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पथकाने अवघ्या दोन तासांत चारही आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चेतन उर्फ बटाटा रमेश सुशीर (वय २१, संत मिराबाई नगर, जळगाव), उमाकांत दत्तात्रेय जाधव (संत मिराबाई नगर, जळगाव), गौरव संजय जाधव (वय २१, साईनगर, जळगाव) आणि रोशन भगवान पाटील (वय २६, पांडुरंग नगर, जळगाव) यांचा समावेश आहे.
यापैकी चेतन उर्फ बटाटा सुशीर हा पोलीस अभिलेखावरील हिस्ट्रीशीटर असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच उमाकांत जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. त्याच्यावर जिल्हापेठ, जळगाव शहर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांत विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
- कारवाईत डीबी पथकाचे सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोलीस हवालदार योगेश पाटील, विनाश देवरे, कैलास इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण कोळी, दीपक देवरे, किरण पाटील तसेच वाहन चालक पंकज देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे करीत आहेत.








