जळगाव(प्रतिनिधी : राजू शेख):दि. २८ ऑक्टोबर २०२६ : जळगाव येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत हरविलेले १८ मोबाईल फोन शोधून काढले आहेत. अंदाजे ३ लाख रुपये किमतीचे हे मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत करून त्यांच्या मूळ मालकांना परत केले. CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना नागरिकांचे हरविलेले व गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान CEIR पोर्टलवरील माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हरविलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी एकूण १८ मोबाईल फोन हस्तगत केले. त्यानंतर हे सर्व मोबाईल संबंधित मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले.
या मोहिमेत पोलीस हेड कॉन्स्टेबल मोतीलाल विठ्ठल बोरसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद लाडवंजारी आणि महिला पोलीस अंमलदार रामकला राठोड यांनी तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून मोबाईल शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयासिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोतीलाल विठ्ठल बोरसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद लाडवंजारी आणि महिला पोलीस अंमलदार रामकला राठोड यांनी या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी केली.
हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांना दिलासा मिळाला असून, एमआयडीसी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

