जळगाव (प्रतिनिधी: हिरालाल राजपूत): जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. २६ ऑक्टोबर रोजी कासोदा आणि पारोळा पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करत एकूण सहा गुन्हे दाखल केले असून, सहा आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत वाळू आणि वाहने असा एकूण ३२ लाख ४७ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने अवैध वाळू उत्खनन आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेला विशेष पथके तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
कासोदा पोलिसांची गिरणा नदीपात्रात कारवाई
कासोदा पोलिसांनी गिरणा नदीपात्रातील गावाच्या वेशीजवळील मारुती मंदिर परिसर, एरंडोल तालुक्यातील करदन शिवार आणि हनुमंत खेडेसीम शिवारातील खुशी हॉटेलजवळ कारवाई केली. या ठिकाणी वाळूची अवैध वाहतूक व उत्खननाशी संबंधित प्रकरणे उघडकीस आली.
या कारवाईत आयशर व टाटा कंपनीचे डंपर, अन्य वाहने आणि वाळू जप्त करण्यात आली. संबंधित प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६२ चाही समावेश आहे.
पारोळ्यात ट्रॅक्टरसह वाळू जप्त
पारोळा पोलिसांनी किसान कॉलेज परिसरात, जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ जवळ कारवाई केली. या वेळी एक स्वराज ट्रॅक्टर, ट्रॉली आणि पाच ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम ३०३(२) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम ९ आणि १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळ, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड आणि श्री. विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, कासोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील तसेच त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सहभाग घेतला.
अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

