दक्षता जनजागृती सप्ताहाला जळगावात प्रारंभ; वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ३६ कारवाया

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: राजू शेख)

 

‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ या संकल्पनेतून भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती; ४४ आरोपींना अटक

 

जळगाव : भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि पारदर्शक कारभाराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह २०२६’ साजरा करण्यात येत आहे. ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ (Probity for Prosperity) ही संकल्पना घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव घटकाच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सोमवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेण्यात आली. यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशांचे वाचन करून सप्ताहातील कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली.

 

शहरातील प्रमुख चौकांत जनजागृती

 

जळगाव शहरातील नवीन बसस्थानक, रेल्वे स्टेशन, शिवाजी पुतळा चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, रत्नावली चौक, टॉवर चौक आणि नेरी नाका चौक आदी प्रमुख ठिकाणी भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीसाठी मोठे फलक लावण्यात येणार आहेत. नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ बाबत माहिती देण्यात येणार असून, शासकीय कार्यालयांच्या परिसरात जनजागृतीपर पोस्टर्स लावणे, माहितीपत्रकांचे वाटप करणे आणि नागरिकांना मार्गदर्शन करणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

 

लाच मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन

 

‘लाच घेणे अथवा लाच देणे हा गुन्हा आहे’, हा संदेश प्रत्येक शासकीय कार्यालयात ठळकपणे प्रदर्शित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कार्यालयीन पत्ता, संपर्क क्रमांक आणि टोल फ्री क्रमांक १०६४ नागरिकांना सहज उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

 

भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास किंवा शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि केबल नेटवर्कच्या माध्यमातूनही भ्रष्टाचारविरोधी जनजागृती केली जाणार आहे.

 

जानेवारीपासून ३६ कारवाया; ४४ आरोपींना अटक

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव घटकाने जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध एकूण ३६ कारवाया केल्या असून, या कारवायांमध्ये ४४ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

 

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन सहकार्य करावे आणि लाच मागणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव घटकाच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

भंगारातील टायरला नवी झेप; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘टायर हॅकथॉन’...

जळगाव (प्रतिनिधी: आसमा शेख): शहरातील रामेश्वर कॉलनी येथील मेहरून रोजी आज टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने मेहरूण येथील श्री संत...

गोदावरी कॉलेजजवळ कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला; तीन आरोपी...

जळगाव (प्रतिनिधी:इमरान खान): शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ उधारीवर पान-सिगारेट न दिल्याच्या कारणावरून एका व्यावसायिकावर कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि. २३)...

फत्तेपुर पोलिसांची गुटखा तस्करांविरुद्ध कारवाई; १ लाख ६ हजारांचा...

फत्तेपुर (प्रतिनिधी: सतीश राठोड): प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्याविरुद्ध फत्तेपुर पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केली. या कारवाईत विमल पानमसाला,...

संपादक - रजत शेख

Latest