महामार्गावरील अपघातांना जबाबदार कोण? मृतांच्या वारसांना २५ लाखांची भरपाई द्या!

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन)

जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची वाढती मालिका आणि त्यात होणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाली आहे. महामार्गावरील अपघातांना जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच अपघातांत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली. बुधवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन देताना प्रकल्प संचालकांच्या खुर्चीवर रक्ताळलेले कपडे ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.

 

निष्काळजीपणामुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप

 

गिरणा नदीवरील बांभोरी पूल ते खोटेनगर आणि तरसोद फाटा परिसरातील महामार्गावर संबंधित यंत्रणा व कंत्राटदारांच्या कथित निष्काळजीपणामुळे अल्पावधीत १२ निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या सर्व अपघातांची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल जनतेसमोर जाहीर करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि जबाबदार कंत्राटदाराला कायदेशीररीत्या जबाबदार धरावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

 

अर्धवट कामे आणि धोकादायक रचनेवर बोट

 

महामार्गावरील रखडलेली कामे, गटारींचे अपूर्ण बांधकाम, चुकीची व धोकादायक वळणे, रस्त्यावरील अतिक्रमणे, बेवारस उभी असलेली वाहने आणि बांधकामाचे साहित्य पडून राहणे, ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचा दावा पक्षाने केला. याशिवाय नादुरुस्त सिग्नल यंत्रणा, अवाजवी मोठी सर्कल, पथदिव्यांचा अभाव आणि बायपासच्या कामातील विलंबामुळे वाहनचालकांसह नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

 

पाच प्रमुख चौकांत उड्डाणपुलांची मागणी

 

अपघातांना आळा घालण्यासाठी कालिकामाता चौक, अजिंठा चौक, इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक आणि शिवकॉलनी चौक या वर्दळीच्या ठिकाणी तातडीने उड्डाणपूल उभारावेत, अशी मागणी करण्यात आली. संपूर्ण महामार्गावर दर्जेदार पथदिवे बसवावेत आणि प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही पक्षाने म्हटले आहे.

 

जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, युवक महानगर अध्यक्ष विनायक पाटील, महानगर उपाध्यक्ष गणेश पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन, संग्राम सूर्यवंशी, मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, मजहर पठाण, सुभाष चौधरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

गोदावरी कॉलेजजवळ कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला; तीन आरोपी...

जळगाव (प्रतिनिधी:इमरान खान): शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ उधारीवर पान-सिगारेट न दिल्याच्या कारणावरून एका व्यावसायिकावर कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि. २३)...

फत्तेपुर पोलिसांची गुटखा तस्करांविरुद्ध कारवाई; १ लाख ६ हजारांचा...

फत्तेपुर (प्रतिनिधी: सतीश राठोड): प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्याविरुद्ध फत्तेपुर पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केली. या कारवाईत विमल पानमसाला,...

पहूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीस गेलेली बैलजोडी हस्तगत, २.८५...

पहूर(प्रतिनिधी: मुकेश): पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीस गेलेली बैलजोडी हस्तगत करण्यात पहूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता,...

संपादक - रजत शेख

Latest