जळगाव(प्रतिनिधी: मोसिन शेख): दि. २२ ऑक्टोबर : धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात मागील सुमारे दोन वर्षांपासून फरार असलेल्या दोन पाहिजे आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे फरार आरोपींचा शोध घेण्याच्या मोहिमेला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यांमधील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथकाची नियुक्ती करून फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी धुळे जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६०/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०९(४) व ३(५) नुसार गुन्हा दाखल आहे.
माहिती मिळताच विशेष पथक धुळे जिल्ह्यात रवाना झाले. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना धरणगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे
१. अजय भाईदास थोरात (वय २७), रा. नवलनगर, ता. जि. धुळे.
२. संभाजी बाळू पाटील (वय २६), रा. सातरने, ता. जि. धुळे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील पाटील, चोपडा उपविभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या विशेष पथकात पोलीस उपनिरीक्षक श्री. संतोष पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल हरिलाल पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल विलेश सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कोळी, पोलीस कॉन्स्टेबल विलास गायकवाड आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी यांचा समावेश होता.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईमुळे फरार आरोपींना शोधून काढण्यात यश आले असून, जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींविरोधातील मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

