जळगाव (प्रतिनिधी: राजू शेख):
जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माऊली नगर, खेडी बुद्रुक येथे मोटारसायकलचा लाईट सुरू-बंद करण्यावरून झालेल्या वादातून धारदार चॉपरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात किरण विठ्ठल पाटील (वय ४४) यांचा मृत्यू झाला, तर किशोर छगन पाटील (वय ३५) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी मयूर चैत्राराम जाधव याला एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांच्या आत ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास माऊली नगर परिसरात ही घटना घडली. संशयित आरोपी मयूर जाधव हा मोटारसायकलवरून परिसरात आला होता. त्याने मोटारसायकलचा लाईट सुरू-बंद केल्याबाबत तेथे बसलेल्या महिलांनी जाब विचारल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून आरोपीने धारदार चॉपरने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात किरण पाटील यांचा मृत्यू झाला, तर किशोर पाटील गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी जखमी किशोर छगन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०३(१), १०९(१), ३५१(२) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची नियुक्ती केली. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक माहिती गोळा केली. तसेच तांत्रिक तपास आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयित आरोपी मयूर चैत्राराम जाधव याला ताब्यात घेतले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, गिरीष पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी, रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, राहुल घेटे, गणेश ठाकरे, किरण पाटील, शशिकांत मराठे, ललित नारखेडे आणि मोतीलाल बोरसे यांनी सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.

