जळगाव (प्रतिनिधी:इमरान खान): एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्दीतील ढोर बाजार परिसरातील इलेक्ट्रिक दुकानात झालेल्या घरफोडी चोरीचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ३ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० ते ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजेदरम्यान ढोर बाजारातील मातोश्री इलेक्ट्रिक दुकानाचे शटर वाकवून व कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ४० किलो तांब्याची तार तसेच मोटार व लूम रिपेअरिंगसाठी लागणारे साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७२१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या तसेच चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलीक धनके यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. तसेच तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.
या तपासादरम्यान हर्षल गोपाल परदेशी (वय २२, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव), कमलेश सुरेश पवार (वय २१, रा. सुमेरसिंग हॉटेलच्या बाजूला, कुसुंबा, ता. जि. जळगाव) आणि रितेश निवृत्ती साळुंखे (वय २१, रा. दत्तमंदिराजवळ, कुसुंबा, ता. जि. जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्यातील चोरीबाबत माहिती दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल :
– ६०,००० रुपये किमतीची ४० किलो नवीन व जुनी तांब्याची तार.
– ३०,००० रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (गुन्ह्यात वापरलेली).
अशा प्रकारे एकूण ९०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलीक धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश चौधरी, प्रमोद लाडवंजारी, रामकृष्ण पाटील, किरण चौधरी, गिरीश दिलीप पाटील, मोतीलाल बोरसे, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकुर, राहुल घेटे, किरण पाटील, गणेश ठाकरे, ललित नारखेडे तसेच पोलीस अंमलदार शशिकांत मराठे आणि रमाकांत साळुंखे यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली.








