बोदवड(प्रतिनिधी):दि. ४ सप्टेंबर : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बोदवड पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शुक्रवारी व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत ६० रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आढळून आलेल्या तिघांविरुद्ध कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, आठ पोलीस अधिकारी, १३० पोलीस अंमलदार तसेच आर.सी.पी. पथक सहभागी झाले होते.

अवैध दारूविरुद्ध कारवाई
ऑपरेशनदरम्यान अवैध दारूविरुद्ध कारवाई करून एकूण १० हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये ५५ लिटर गावठी दारू आणि ६६ नग देशी दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे. संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
४२ संशयित मोटारसायकलींची तपासणी
पोलिसांनी एकूण ४२ संशयित मोटारसायकलींची तपासणी केली. या वाहनांची कागदपत्रे आणि मालकी हक्काबाबत पडताळणी सुरू आहे. तसेच आर.टी.ओ. विभागामार्फत वाहनांची तपासणी करण्यात येत असून, अनियमितता आढळल्यास संबंधित वाहनधारकांविरुद्ध नियमानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील, परि. उप अधीक्षक सह्याद्री बिर्ले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह आठ पोलीस अधिकारी, १३० पोलीस अंमलदार व आर.सी.पी. पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
बोदवड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवणे, अवैध व्यवसायांना आळा घालणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागरिकांना आवाहन : गुन्हेगारी प्रवृत्ती, अवैध दारूविक्री, अंमली पदार्थांची विक्री, जुगार तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांना सहकार्य करावे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.








