जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन): चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विनाक्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, ती शनीपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. किरण पंढरीनाथ वानवडे व पो.कॉ. प्रविण राजेंद्र जाधव हे जिल्हापेठ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी कांताई नाट्यगृह परिसरात दोन इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली.
माहितीची खात्री करून पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता, दोन इसम विनाक्रमांकाची बजाज पल्सर मोटारसायकल घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून वाहनाची कागदपत्रे व मालकी हक्काबाबत विचारणा केली असता, त्यांनी समाधानकारक माहिती दिली नाही.
चौकशीत त्यांनी आपली नावे मनोज दत्तू चौधरी (वय २४, रा. ज्ञानदेव नगर परिसर, जुना खेडी रोड, जमुना नगर, जळगाव) आणि सुमित शंकर चौधरी (वय ३१, रा. श्रीराम चौक, हरिओम नगर, जळगाव) अशी सांगितली.
RTO तपासणीत चोरीचा प्रकार उघड
पोलिसांनी मोटारसायकलीचा चेसीस क्रमांक MB2368BX0NWC18568 व इंजिन क्रमांक DHXWNC58066 यांच्या आधारे RTO अॅपवरून तपासणी केली. त्यावेळी वाहनाचा नोंदणी क्रमांक MH-19-DY-7458 असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर वाहनमालकाशी संपर्क साधून अधिक माहिती घेतली असता, सदर मोटारसायकल चोरीस गेल्याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ८९/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समोर आले.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
अनोळखी व्यक्तींकडून कमी किमतीत किंवा संशयास्पद पद्धतीने वाहने खरेदी करण्यापूर्वी वाहनाची कागदपत्रे, नोंदणी क्रमांक, चेसीस क्रमांक व मालकी हक्काची खात्री करावी. चोरीच्या वाहनांच्या खरेदी-विक्रीबाबत किंवा संशयास्पद वाहनाबाबत माहिती मिळाल्यास ती तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास कळवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पो.हे.कॉ. किरण पंढरीनाथ वानवडे व पो.कॉ. प्रविण राजेंद्र जाधव यांनी उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावली.








