मेहरूण(प्रतिनिधी: सरिता महाजन): विद्यार्थ्यांना भारतीय धार्मिक व सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, संस्कृती व परंपरांविषयी आदर निर्माण व्हावा, तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानाची सांगड घालता यावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण यांच्या वतीने श्रावण महिन्याचे औचित्य साधून बेलेश्वर महादेव मंदिर येथे शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले.

या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बेलेश्वर महादेव मंदिरास भेट देऊन भगवान महादेवाचे दर्शन घेतले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना श्रावण महिन्याचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व, भारतीय संस्कृतीतील मंदिरांचे स्थान, संतपरंपरा तसेच विविध धार्मिक परंपरांमागील मूल्ये याबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील माहितीला प्रत्यक्ष स्थळभेटीच्या अनुभवाची जोड मिळाली.








