जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान) जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तत्परता दाखवत चोरीचा गुन्हा अवघ्या पाच तासांत उघडकीस आणला आहे. या कारवाईत दोन सराईत आरोपींसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीतील १२ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते ४.३० वाजेदरम्यान, जळगाव शहरातील शाहूनगर परिसरातील शाहू कॉम्प्लेक्स येथे ही चोरीची घटना घडली होती. फिर्यादी अनिल राजमल कासट (वय ६२), व्यवसाय मॅनेजर (महेश प्रगती मंडळ) व दूध विक्रेता, रा. १७६, एमआयडीसी, म्हाडा कॉलनी, जळगाव यांच्या पॅन्टच्या खिशातील १२ हजार ५०० रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती.
याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक ३३५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना गुन्ह्याचा तातडीने तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या तसेच चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी आपल्या अधिपत्याखालील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार करून तपासाला गती दिली.
सीसीटीव्ही व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध
गुन्हे शोध पथकाने गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून या चोरीच्या गुन्ह्यात शहीदखान नजीरखान (वय २७), रा. युसूफ मेडिकलजवळ, गेंदालाल मिल, जळगाव, समीर खान मजीदखान (वय ३७), रा. बि. नं. १९, घर नं. १५, गेंदालाल मिल, जळगाव, तसेच एका विधी संघर्षित बालकाचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तिघेही गेंदालाल मिल परिसरातील एका दुकानाजवळ असल्याची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी कौशल्यपूर्ण व सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर दोन्ही प्रौढ आरोपींना अटक करण्यात आली असून, विधी संघर्षित बालकास कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून चोरीतील १२ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
या पथकाची उल्लेखनीय कामगिरी
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली GPSI सुनील पाटील, सफौ दीपक शिरसाट, पोहेकों नंदलाल पाटील, पोहेकों भगवान पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, पोहेकॉ सतीश पाटील, पोहेकों विरेंद्र शिंदे, पोहेकॉ योगेश पाटील, पोकों अमोल ठाकुर, पोकों राहुलकुमार पांचाळ, पोकों प्रणय पवार आणि पोकों भगवान मोरे यांच्या पथकाने ही
उल्लेखनीय कामगिरी केली.








