डांभुर्णी येथे भर चौकात हवेत गोळीबार; यावल पोलिसांची कारवाई, गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

Spread the love

यावल(प्रतिनिधी: राजू शेख):दि. २८ : तालुक्यातील डांभुर्णी येथे भर चौकात गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या कोळन्हावी येथील विद्यमान सरपंचास यावल पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिन व एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत यावल पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास कोळन्हावी येथील सरपंच विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७, रा. कोळन्हावी, ता. यावल) याने मौजे डांभुर्णी येथील चौकात गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, पोहेकॉ रोहिल गणेश, पोलीस कर्मचारी अनिल साळुंखे व हितेश बागुल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता किनगाव रोडलगत असलेल्या शिवसम्राट सोयाबीन बिर्याणी दुकानाजवळ नुकताच फायर करण्यात आलेल्या राऊंडची रिकामी पुंगळी आढळून आली. तसेच परिसरातील दुकानचालकांकडे चौकशी केल्यानंतर विकास सोळंके याने गोळीबार केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून रिकामी पुंगळी व इतर भौतिक पुरावे जप्त करण्यात आले.

गोळीबारानंतर आरोपी जळगावकडे निघून गेल्याची माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन व पोलीस कर्मचारी सचिन पाटील यांना आरोपीच्या शोधासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले. यावल पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ सलीम तडवी, पोलीस कर्मचारी प्रदीप चवरे व सचिन घुगे यांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम राबवून आरोपी विकास उर्फ गोटू सोळंके यास रात्री सुमारे १ वाजता जळगाव येथील कालंका माता मंदिर परिसरातून ताब्यात घेतले.

यावल पोलीस स्टेशन येथे आरोपीची सखोल चौकशी करण्यात आली असता त्याने गोळीबार केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत आरोपीचा कोळन्हावी परिसरात आदर्श हॉटेल, बिअर बार व परमिट रूम व्यवसाय असल्याचे समोर आले आहे. डांभुर्णी गावातील काही युवक त्याच्या हॉटेल व बिअर बारमध्ये येऊन मोबाईलवर व्हिडिओ काढून त्रास देत असल्याचा आरोपीचा आरोप असून, दि. २६ ऑगस्ट रोजी त्यांच्यात वाद झाला होता. या युवकांवर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोपीने दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री डांभुर्णी येथे येऊन हवेत गोळीबार केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

गोळीबारासाठी वापरलेले हत्यार आरोपीने कोळन्हावी गावाच्या शिवारातील स्वतःच्या मालकीच्या आदर्श हॉटेलजवळील शेतात लपवून ठेवल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तेथून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिन व एक जिवंत काडतूस जप्त केले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५ तसेच भारतीय हत्यार कायद्यातील कलम ३(१), २५(१-ब), ५(१), २५(१)(अ), २५(९) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, सफौ हेमंत सांगळे, पोहेकॉ रोहिल गणेश, पोलीस कर्मचारी हितेश बागुल, सचिन पाटील, अनिल साळुंखे तसेच चालक पोलीस कर्मचारी संतोष पाटील यांनी विशेष भूमिका बजावली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वीर गाथा 6.0’; छत्रपती शिवाजी...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या शौर्य व पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आनंददायी शनिवारचा अनोखा उपक्रम चिमुकल्यांच्या...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरूण शहरातील आज रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप संत ज्ञानेश्वर...

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर...

संपादक - रजत शेख

Latest