जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन) शहरातील आज रोजी
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले – लेक वाचवा, लेक शिकवा’ या अभियानांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या संचालिका सौ. अर्चना प्रशांत नाईक यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. दिनांक ३० जानेवारी २०२६ पर्यंत इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलींना इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मोफत शिक्षण/प्रवेश देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. हा निर्णय स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने घेतल्याचे मत सौ. अर्चना प्रशांत नाईक यांनी व्यक्त केले. महिला शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून शिक्षणाच्या जोरावर मुली स्वावलंबी होतील आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमात इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अंकिता फुलचंद्र यादव हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रभावी एकांकिका सादर केली. तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सामूहिक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक, पर्यवेक्षिका शितल कोळी, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.









