जळगाव (प्रतिनिधी) – मुलाला पळविण्याच्या अफवेवरून जमावाकडून करण्यात आलेल्या मारहाणीत ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील अव्हाणे शिवारात घडली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून इतर अनोळखी व्यक्तींचा शोध सुरू आहे.
सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास जळगाव–कानळदा रोडवरील लक्ष्मी जिनिंग परिसरात एक अनोळखी तरुण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची चर्चा पसरली. परिसरातील मनोहर भगवान सोनवणे यांचा तीन वर्षीय मुलगा विराट उर्फ लकी याला संबंधित तरुण उचलून नेत असल्याचा संशय उपस्थितांना आला. अफवा पसरताच मोठा जमाव गोळा झाला.
कोणतीही खातरजमा न करता किंवा पोलिसांना तातडीने कळवण्याऐवजी जमावाने त्या तरुणाला पकडून बेदम मारहाण केली. दरम्यान, अव्हाणे गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी घटनेची माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्यास दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा संबंधित तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा, ता. जळगाव), अजय डोंगर कोळी (रा. थोरगव्हाण, ता. यावल), प्रशांत उर्फ प्रकाश शशिकांत सोनवणे, अजय उर्फ बादल शशिकांत सोनवणे (रा. बामणोद, ता. यावल) आणि अफताब आरिफ खाटीक (रा. शनिपेठ, जळगाव) या पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर सहभागींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा मॉब लिंचिंगचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद बाब तातडीने पोलिसांना कळवावी, तसेच कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.









