भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे गेल्या पंधरा दिवसांपासून एका माकडाने धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत आतापर्यंत सुमारे ३५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे

वरणगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे एका माकडाच्या हल्ल्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी गाव परिसरात माकडांची एक टोळी दाखल झाली होती. त्यातील इतर माकडे निघून गेली असली तरी एक माकड गावातच थांबले असून ते आक्रमक बनले आहे. संबंधित माकड घरात घुसून महिला, वृद्ध तसेच लहान मुलांवर अचानक झडप घालत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

माकडाच्या हल्ल्यांमुळे अनेक जण जखमी झाले असून काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका व्यक्तीला गच्चीवरून ढकलल्याने गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर भुसावळ येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चाव्यामुळे जखमी झालेल्या इतर नागरिकांनाही लसीकरण व उपचार देण्यात येत आहेत.

माकड स्वयंपाकघरात घुसून अन्नधान्य व घरगुती वस्तूंची नासधूस करत असल्याने आर्थिक नुकसानही होत आहे. भीतीपोटी पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे तात्पुरते बंद केले आहे, तर काही शेतमजूर शेतात जाणे टाळत आहेत. त्यामुळे गावातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

ग्रामस्थांनी वनविभागाकडे वारंवार तक्रारी केल्या असून तातडीने पिंजरा लावून माकडाला पकडण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS