जळगावातील मोबाईल दुकानदाराचे अपहरण; २० लाखांच्या खंडणीचा कट उधळला, तिघे ताब्यात

जळगाव(प्रतिनिधी ):दि. १६ फेब्रुवारी २०२६ — जळगाव शहरातील मोबाईल साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदाराचे आणि त्यांच्या भाच्याचे अपहरण करून २० लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन प्रौढ आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजेपासून दि. १६ फेब्रुवारी रोजी पहाटे १.३० वाजेपर्यंत ही घटना घडली. आरोपी यश जितेंद्र माकोडे (वय २२, रा. चंदनवाडी, शनिपेठ, जळगाव) याने फिर्यादी कृष्णकुमार डुंगराराम चौधरी (वय ३२) यांचा भाचा गणपतलाल घेवाराम माली (वय १९) यास जळगाव येथील ममुराबाद रोडवरील दक्षिणमुखी वीर हनुमान मंदिराजवळील एका घरात बांधून ठेवले.

त्यानंतर फिर्यादी कृष्णकुमार चौधरी यांना मोटारसायकलवरून अकोला येथे नेण्यात आले. तेथे आरोपीने आपल्या साथीदार युवराज गणेश पवार (वय २४, रा. ताथोड नगर, अकोला) यांच्या मदतीने त्यांना एका घरात डांबून ठेवले. या ठिकाणी फिर्यादींकडून गुगल पेच्या माध्यमातून १५,००० रुपये ऑनलाईन स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतल्याची माहिती आहे.

दरम्यान, आरोपींच्या १५ वर्षीय अल्पवयीन साथीदाराने गणपतलाल माली यास मोटारसायकलवरून अकोला येथे आणले. त्यानंतर तिघांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या भाच्याला ताथोड नगर, अकोला येथील एका घरात कैद करून ठेवले. आरोपींनी भाच्याला जीवे मारण्याची धमकी देत २० लाख रुपये आणण्याची मागणी केली व फिर्यादींना जळगाव येथे पाठवले.

फिर्यादींनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सी.सी.टी.एन.एस. क्र. २३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२), १४०(२), १४२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासाची माहिती

घटनेचे गांभीर्य ओळखून शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी तात्काळ तपास सुरू केला. अपहरण झालेल्या तरुणाच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून अकोला जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यात आला. अकोला येथील पथकाने तात्काळ कारवाई करून गणपतलाल माली यांची सुखरूप सुटका केली व आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अकोला येथे जाऊन आरोपी व पीडितांना शनिपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलीस निरीक्षक शंकर शेळके (अकोला जिल्हा एलसीबी प्रभारी), तसेच जळगाव एलसीबी व शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीपणे बजावली.

पुढील तपास शनिपेठ पोलीस करीत आहेत.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS