जळगाव (प्रतिनिधी): फेब्रुवारी–मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त, पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व यंत्रणांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात इयत्ता बारावीची परीक्षा दि. १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत ८२ परीक्षा केंद्रांवर होणार असून इयत्ता दहावीची परीक्षा दि. २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत १४७ केंद्रांवर पार पडणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी ५९ हजार ४२० तर बारावीच्या परीक्षेसाठी ४८ हजार २३२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
सर्व परीक्षा केंद्रांवरील पाणी, वीज, बैठक व्यवस्था आदी मूलभूत सुविधांची तपासणी बीओ केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी पूर्ण केल्याचे बैठकीत सांगण्यात आले. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात आली असून ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत, तेथे तत्काळ बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रश्नपत्रिकेच्या वाहतुकीसाठी पोलीस बंदोबस्त, परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवणे, ५० मीटर परिसरात अनधिकृत प्रवेशास मनाई तसेच विद्यार्थ्यांची फ्रिस्किंग प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संवेदनशील परीक्षा केंद्रांवर बैठी व फिरती पथके, ड्रोन कॅमेरे तसेच व्हिडिओग्राफीद्वारे विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून मोबाईलच्या गैरवापरास प्रतिबंध करण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर मालप्रॅक्टिसेस कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.
कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्याभरात झूम अॅपद्वारे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक वर्गामध्ये झूमद्वारे व्हिडिओ चित्रीकरण होणार असून याचे नियंत्रण तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावर स्वतंत्र समित्यांमार्फत करण्यात येईल. प्रश्नपत्रिका सुरू होण्यापासून ते परीक्षा संपेपर्यंत सतत निरीक्षण ठेवले जाणार आहे.
बैठकीत कायदा व सुव्यवस्था, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, सुरक्षा व निरीक्षण यंत्रणा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला. भरारी पथक व तपासणी पथकांचे प्रभावी नियोजन तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधून जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
विद्यार्थ्यांना निर्भय, शांत व अनुकूल वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले. निष्पक्ष, पारदर्शक व गुणवत्ताधिष्ठित परीक्षा प्रक्रिया सुनिश्चित करणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.









