वडिलांच्या उपचारासाठी जळगावकडे येताना काळाचा घाला; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील पिता–पुत्राचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) :

वडिलांवर उपचार करण्यासाठी दुचाकीवरून जळगावकडे निघालेल्या पिता–पुत्रावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घार्डी फाट्याजवळ घडली. अज्ञात ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत मोहम्मद लुकमान ठोके (वय ३९) आणि त्यांचे वडील लुकमान खा मुसे खा ठोके (वय ७५) यांचा जागीच मृत्यू झाला.

चोपडा तालुक्यातील लासूर येथील रहिवासी असलेले लुकमान खा ठोके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचा मुलगा मोहम्मद लुकमान त्यांना उपचारासाठी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात घेऊन जात होता. दोघेही दुचाकीवरून जळगावकडे येत असताना, घार्डी फाटा परिसरात समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांनाही तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.

मोहम्मद लुकमान ठोके हे भंगार विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष आणि वडील दोघेही एकाच अपघातात गेल्याने लासूर परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, शासकीय रुग्णालयात जळगावचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. या दुर्दैवी घटनेमुळे चोपडा तालुक्यातील लासूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS