संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रम उत्साहात संपन्न

जळगाव(प्रतिनिधी ): शहरातील रामेश्वर कॉलनी येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांमधील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण कसा कमी करावा, अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन तसेच सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या शंकांचे समाधान केले. आत्मविश्वास, नियमित अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हे यशाचे मुख्य सूत्र असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमातील प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. पंतप्रधानांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून परीक्षेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत सकारात्मकता व आत्मविश्वास वाढीस लागला आहे. आगामी परीक्षांसाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS