जळगाव (जिल्हा प्रतिनिधी: इम्रान खान)दि. 29 डिसेंबर 2025
मच्छीमार्केट, तांबापुरा परिसरात गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घरात गांजा साठवून ठेवणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे 19 हजार 320 रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.
दि. 26 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे मा. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय बातमी मिळाली की, तांबापुरा परिसरात एक इसम गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्या घरात गांजा बाळगून आहे. सदर माहितीची खात्री करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी, पोकॉ गणेश ठाकरे, पोकॉ शशिकांत मराठे, पोकॉ राहुल घेटे आदी कर्मचाऱ्यांचे पथक शासकीय वाहनाने घटनास्थळी रवाना झाले. मच्छीमार्केटजवळ वाहन उभे करून पायी एका गल्लीतील घरात पाहणी केली असता, एक इसम हातात गोणी घेऊन बसलेला आढळून आला.
त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव शेख अशपाक शेख मेहमुद (वय 23 वर्षे), रा. मच्छीबाजार, तांबापुरा, जळगाव असे सांगितले. त्याच्या ताब्यातील गोणीची तपासणी केली असता त्यामध्ये गांजासदृश पदार्थ आढळून आला.
यानंतर फोटोग्राफर, वजनकाटाधारक, फॉरेन्सिक तज्ञ व पंचांना घटनास्थळी बोलावून गोणीची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीअंती आरोपीकडे 3 किलो 220 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला असून त्याची अंदाजे किंमत 19,320 रुपये इतकी आहे.
सदर गांजा पंचनामा करून जप्त करण्यात आला असून आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक 930/2025, NDPS कायदा कलम 8(क), 20(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व पोकॉ चेतन पाटील करीत आहेत
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.








