जळगाव (प्रतिनिधी): शहरातील गजबजलेल्या आठवडे बाजारात पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आली असून, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.
कासमवाडी परिसरातील बाजारात शनिवारी (११ एप्रिल) सायंकाळी सुमारे ५:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विद्युत कॉलनी परिसरात राहणाऱ्या बाली भरतसिंग राजपूत या नेहमीप्रमाणे बाजारासाठी गेल्या असताना, गर्दीचा फायदा घेत चोरट्याने अत्यंत चलाखीने त्यांच्या गळ्यातील पोत ओढून नेली. काही वेळानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला.
चोरीस गेलेल्या पोतमध्ये सोन्याच्या वाट्या असून त्याचे एकूण वजन २३.८९ ग्रॅम आहे. बाजारभावानुसार या दागिन्यांची किंमत सुमारे ८३ हजार रुपयांहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी बाली राजपूत यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान टहकळे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, शहरात वाढत्या गर्दीच्या ठिकाणी अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांनी, विशेषतः महिलांनी दागिने परिधान करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.