बारदान विक्रीच्या बहाण्याने व्यापाऱ्याची ६ लाखांची फसवणूक

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील डीएसपी चौक परिसरात बारदान (गोण्या) विक्रीचा बहाणा करून एका व्यापाऱ्याची तब्बल ६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

जळगाव शहरातील प्रजापत नगर (शनीपेठ) परिसरात राहणारे आणि व्यापारी असलेले प्रकाश श्रीराम प्रजापत (वय ५०) यांना संशयित आरोपी रविंद्र तायडे व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी बारदान विक्रीचा व्यवहार करण्याचे आमिष दाखवले. हा व्यवहार २३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान डीएसपी चौकातील एका सार्वजनिक ठिकाणी झाला.

या व्यवहारादरम्यान आरोपींनी प्रजापत यांच्याकडून एकूण ६ लाख रुपये घेतले. यात ५०० रुपयांच्या नोटांची दोन बंडले (१ लाख रुपये) तसेच २०० रुपयांच्या नोटांची पाच बंडले (५ लाख रुपये) असा समावेश होता. मात्र, पैसे घेतल्यानंतरही आरोपींनी ठरलेले बारदान न देता घटनास्थळावरून पळ काढला.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रकाश प्रजापत यांनी २ फेब्रुवारी २०२६ रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी रविंद्र तायडे व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS