पैशांच्या वादातून आईला शिवीगाळ; मध्यस्थी करणाऱ्या भावावर लोखंडी पाईपने हल्ला

जळगाव (प्रतिनिधी) : एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीतील पंढरपूर नगर परिसरात पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाने कुटुंबीयांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित शंतनू चंद्रकांत गुरव (रा. हनुमान नगर, अयोध्या नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार मयूर चंद्रकांत गुरव (वय २१, रा. पंढरपूर नगर) हे आपल्या आई-वडिलांसह राहतात. २ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता शंतनू हा मयूरच्या घरी आला. त्याने मयूरच्या आईकडे पैशांची मागणी केली. मात्र, “सध्या माझ्याकडे पैसे नाहीत,” असे सांगितल्याने तो संतापला आणि मयूरच्या आईला शिवीगाळ करू लागला.

यावेळी मयूर व त्याच्या वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, शंतनूने हातातील लोखंडी पाईपने मयूरच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात मयूर जखमी झाला. तसेच आरोपीने आई-वडिलांनाही मारहाण करून “तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

घटनेनंतर मयूर गुरव यांनी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी शंतनू गुरव याच्याविरुद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीव मोरे करीत आहेत.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS