शिवनेरी किल्ल्यावर ऐतिहासिक वास्तू जतन सहल

जळगाव (प्रतिनिधी) :

शहरातील रामेश्वर कॉलनी येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी शिवनेरी किल्ला येथे “ऐतिहासिक वास्तू जतन” या शैक्षणिक उपक्रमांतर्गत अभ्यासपूर्ण सहल आयोजित करण्यात आली. ही सहल मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.

 

या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देत बालेकिल्ला, गर्भगृह, भक्कम तटबंदी, पाण्याच्या टाक्या तसेच प्राचीन शस्त्रास्त्रांचे बारकाईने निरीक्षण केले. मार्गदर्शक शिक्षकांनी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व, वारसा जतनाची आवश्यकता, किल्ल्यावरील स्वच्छतेचे महत्त्व तसेच इतिहास संवर्धनात नागरिकांची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

 

माध्यमिक विभागातील सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत “आपला वारसा – आपली जबाबदारी” हा सामाजिक संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विशेष कौतुक केले असून, भविष्यातही इतिहास संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

ही सहल विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली असून इतिहासाविषयी जाणीव निर्माण करणारी ठरली, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS